Wednesday, January 24, 2018

अथर्वशीर्ष...४

गकार: पूर्वरूपम् | 'ग'कार हे पूर्वरूप आहे. अकारो मध्यमरूपम् | 'अ'कार हे मध्यरूप आहे. अनुस्वारश्चान्त्यरूपम् | अनुस्वार हे अन्त्यरूप आहे. बिन्दुरुत्तररूपम् | बिन्दू हे उत्तररूप आहे. नाद: सन्धानम् | संहिता सन्धि:| (ग्, अ, ॅ, ं) ह्या चार वर्णांचा उच्चार एक नादात असावा. चारही वर्णांचा संधी करून  त्याचे एकत्र उच्चारण करावे - गॅं‌. "सैषा गणेशविद्या |" ती ही गणेशविद्या आहे. गणक ऋषि:| (या विद्येचा) गणक (हा) ऋषी आहे. निचृद्गायत्री छंद:| गणपतिर्देवता | निचृद्गायत्री हा छंद आहे. गणपति ही देवता आहे. *ॐ गॅं गणपतये नम:|* ॐ गॅं (मंत्ररूप) गणपतीला नमस्कार असो.

निचृत्= नि:शेष रीतीने एकमेकांस बांधणे, संघटित करणे, प्रकाशित करणे.
गायत्री या छंदात २४ अक्षरे असतात. प्रत्येक चरणात ८ अक्षरे, असे ३ चरण असतात. आठवा मंत्र हा गायत्री छंदात व्यवस्थित बांधलेला गणेश मंत्र आहे.

*एकदन्ताय विद्महे | वक्रतुण्डाय धीमहि | तन्नोदन्ती प्रचोदयात् |*
आम्ही एकदंताला (गणपतीला) जाणतो. वक्रतुंडाचे ध्यान करतो. तो दंती आम्हाला प्रेरणा देवो.

{विद्महे - जाणतो विद्‌ (२ प.प.) उत्तम पुरुष ब.व. धातू परस्मैपदी असून प्रत्यय आत्मनेपदी असे हे अनियमित रूप आहे.
धीमहि - ध्यान करतो ध्यै (१प.प.) उत्तम पुरुष ब.व.पण प्रत्यय अनद्यतन भूतकाळाचा असे हेही रूप अनियमित आहे.}

मंत्रद्रष्ट्या ऋषीला हे स्फुरलेले असल्यामुळे यात व्याकरणदृष्ट्या अनियमित रूपें असूनही याला मंत्ररूप प्राप्त झाले आहे. मननात् त्रायते इति मंत्र:| मनन केले असता रक्षण करतो तो मंत्र असे म्हणतात. यांत हे सामर्थ्य आहे. हा साधनेचा, अनुभवाचा विषय आहे.

आता आपण गणेशविद्येच्या वैज्ञानिक भागाकडे वळूं या. ही गणेशविद्या मुख्यतः तीन टप्प्यांत विकसित झाली. निरनिराळ्या शिलालेखांवर कोरलेल्या अक्षरांचा अभ्यास केलेल्या लिपिकारांनी संशोधनान्ती हे सिद्ध केले आहे. ऋग्वेदांत अनेक उल्लेख आढळतात. "हे अश्वारूढ इंद्रा, आम्ही गोतम कुलाचे कवी तुझ्यासाठी रचलेले नवीन स्तोत्र *कोरून* काढत आहोत. (ऋग्वेद १.६२.१३)

१) वैदिक गणपति 'ब्रह्मणस्पति' - ध्वनिउच्चाराची पाच स्थाने {कण्ठ्य (आद्य), ओष्ठ्य (अन्त्य), तालव्य-मूर्धन्य-दन्त्य (मध्य)} यांच्यासाठी पाच 'अर्धेन्दु'ची कल्पना याने निर्माण केली असावी. मंडलाकाराच्या द्विभाजनाने दोन चंद्र मिळतात. त्यांचा कण्ठ्य आणि ओष्ठ्य गणांच्या लेखनासाठी वापर केला गेला. मंडलाच्या त्रिभाजनाने तालव्य-मूर्धन्य-दन्त्य गणांचे तीन चंद्र मिळतात. (आकृती पहा)

२) महाभारतकालीन गणपति - निव्वळ चंद्रांकित गोल अक्षरे संदिग्धता निर्माण होण्यास कारणीभूत होतात, म्हणून प्रत्येक अक्षरात 'अ' कार दण्डरूपाने देण्याचे काम- "अकारो मध्यमरूपम् |" या गणपतीने केले.

३) नागवंशी राजा 'गणेन्द्र नाग' - याने त्याच्या लिपिशाळेत अक्षरांवर शिरोरेखेचा अलंकार चढविला. (पद्मपुराण शिव-राघव संवादात "सर्वाक्षरे शिरोरेखा अवक्रा, प्रणवंविना" - ॐकार हे प्रणवाक्षर सोडून सर्व अक्षरांवर सरळ शिरोरेखा काढावी - असा उल्लेख आहे) शिरोरेखा हा ध्वन्यात्मक अवयव नाही. देवनगर काशीतून सर्वत्र ही अक्षरशैली पसरल्यामुळे याला *'देवनागरी'* लिपी म्हणतात.

एक मजेदार उल्लेख येथे करावासा वाटतो. व्यंजनदर्शक अर्धेन्दु हे अकाररूपी दण्डाला कोठेतरी चिकटलेले असतात. याला तीन अक्षरांचा अपवाद आहे. ही तीन अक्षरे म्हणजे गणेशविद्येचा कर्ता *गणेश* या शब्दातील ग, ण, व श ही अक्षरे.

हे लिपिविज्ञान म्हणजे "सा एषा गणेशविद्या" श्रीगणपत्यथर्वशीर्षांत आहे.

(अधिक माहितीसाठी वाचा - "सा एषा गणेशविद्या" लिपिकार श्री. ल. श्री. वाकणकर)

भालचंद्र अवधूत नाईक


No comments:

Post a Comment